व्वारे पठ्ठ्या !! नेत्याचा व्याही निघाला मॅरेज स्कॅमर; २५ महिलांशी लग्न करुन सिक्युरिटी गार्ड झाला करोडपती

Foto
सीतापूर : उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहविषयक जाहिरातींच्या माध्यमातून महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करणं आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या अनुज त्रिवेदीला महाराष्ट्रपोलिसांनी ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे. या आरोपीचे मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंध आहेत. नेत्याचा व्याही असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
 
चंद्रावल गावचा रहिवासी असलेला अनुज त्रिवेदी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या नावांनी आणि बनावट ओळखीच्या जोरावर महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात नोंदवलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान असा खुलासा झाला की, आरोपीने विवाहविषयक जाहिरातींच्या माध्यमातून संपर्क साधून किमान २५ महिलांची फसवणूक केली. यामध्ये दिव्यांग, घटस्फोटित, मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि हतबल महिलांचाही समावेश आहे.

९७ लाखांची फसवणूक
२०२२ मध्ये या प्रकरणाची सुरुवात झाली, जेव्हा ठाण्यातील एका ७५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली. अनुजने त्यांच्या ४५ वर्षीय मुलीशी विवाह जाहिरातीच्या माध्यमातून संपर्क साधला आणि २०१९ मध्ये तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्याने त्या कुटुंबाला फ्लॅट विकण्यास तयार केलं आणि नवीन घर बांधण्याचं स्वप्न दाखवून ८२ लाख रुपये लुटले. तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपी त्या महिलेला दिल्लीला घेऊन गेला आणि नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा बहाणा करून ३३ तोळं सोनं घेऊन पसार झाला. अशा प्रकारे पीडितेची एकूण ९७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

बदलत राहायचा नाव आणि ओळख
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज त्रिवेदीने अजय अग्रवाल, संतोष सिंग, जयप्रकाश, रमेश चंद्र गुप्ता यांसारख्या अनेक बनावट नावांचा वापर केला. अटकेच्या वेळी तो ग्रेटर नोएडामध्ये चंद्रप्रकाश त्रिवेदी या नावाने राहत होता. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन आणि एक एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपीचा मुलगाही या संपूर्ण नेटवर्कमध्ये सामील असावा, असा संशय पोलिसांना आहे. तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि कौटुंबिक संबंधांची देखील कसून चौकशी करत आहेत.

सिक्युरिटी गार्ड ते करोडपती बनण्यापर्यंतचा प्रवास
गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षांपूर्वी अनुज लखनौमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करायचा. नंतर त्याने सिक्युरिटी एजन्सी आणि प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू केला. काहीच वर्षांत त्याने कोट्यवधींची मालमत्ता गोळा केली. लखनौमध्ये आलिशान घर आणि गावात शाळा देखील सुरू केली. त्याच्या मुलाच्या लग्नात अनेक मोठे नेते आणि मंत्रीही सहभागी झाले होते. आता महाराष्ट्र पोलीस या तपासात गुंतले आहेत की फसवणुकीतून कमावलेला पैसा कुठे कुठे गुंतवला गेला आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये किती लोक सामील आहेत.